धार्मिक सुधारणा
धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांचे केंद्र म्हणून प्राज्ञपाठशाळामंडळाने महत्त्वाची कामगिरी केली आहे. अर्थातच स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या कामाचे आणि दृष्टिकोनाचे ते प्रकट रूप आहे. महाराष्ट्रात आणि भारतात धार्मिक आणि सामाजिक सुधारणाबाबत ज्या-ज्या सभा भरविल्या गेल्या, त्यांचे वैचारिक नेतृत्व स्वामी केवलानंदांकडे आणि त्यांच्या शिष्यांकडे होते. संस्थेचा विचार व दृष्टिकोन, परिवर्तनवादी प्रागतिक स्वरूपाचा आणि समन्वयाचा राहिला आहे. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्यावेळी, चळवळीसाठी सन १९३३ मध्ये येरवडा तुरुंग, पुणे येथे संस्कृत पंडितांना बोलावले होते आणि अस्पृश्यतेला वेदांमध्ये काही आधार आहे का? याची विचारणा केली होती. अस्पृश्यता विषयांस वेदांमध्ये थोडादेखील आधार नाही, असेच मत स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, के. ल. दप्तरी या व आणखी काही महनीय व्यक्तींनी दिले आणि हा मुद्दा असणाऱ्या पत्रकावर सह्या केल्या आहेत. स्वामी केवलानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या धर्मनिर्णय मंडळ या मंडळांनेही, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत समाजाची वैचारिक भूमिका तयार करण्यासाठी बरीच कामगिरी केली आहे. रघुनाथशास्त्री कोकजे यांचे नाव याबाबतीत महत्त्वाचे आहे.