top of page
Logo_new-removebg-preview.png

सोमनाथ प्राणप्रतिष्ठापना

सोमनाथ जीर्णोद्धाराचा व प्राणप्रतिष्ठेचा विचार हे एक पवित्र, धार्मिक कार्य असून राष्ट्रीय कृत्य आहे या विचाराने कै. वल्लभभाई पटेल यांनी योजना आखली. त्याप्रमाणे ते कामालाही लागले होते त्याकरता मूळचे सोमनाथ मंदिर कोठे आहे हे भूगर्भशास्त्रज्ञ व स्थापत्यतज्ञांकडून मूळ जागा निश्चित करण्यात आली. त्याच जागेवर मंदिराचा कोनशीला समारंभ सरदार वल्लभाई पटेल यांच्या हस्ते झाला. नंतर प्राणप्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात करण्याचे योजिले. दुर्दैवाने सरदार वल्लभाई पटेल यांचे निधन झाले. यानंतर सोमनाथ विश्वस्त प्रमुख श्री. जामसाहेब, श्री. कन्हैयालाल मुनशी, श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी व इतरांनी पुढील जबाबदारी स्वतःवर घेतली. स्थापनेसंबंधीचा शास्त्रीय वाद व काही शास्त्रार्थाचे विवेचन भारतातील काही पंडितांकडून करून घेण्यात आले.


पुढे श्री. मुनशीजींच्या सल्ल््याने सौराष्ट्र राजप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सोमनाथ प्राणप्रतिष्ठा स्वागत समितीने स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या गुरुशिष्यांना पाचारण केले. प्रतिष्ठेच्या धार्मिक कार्याची सर्व जबाबदारी त्यांचेवर टाकली. दि. १५ एप्रिल १९५१ ला या सर्व गोष्टी निश्चित झाल्या. अवघ्या एक महिन्याच्या अवधित तर्कतीर्थांनी प्रतिष्ठेची तयारी केली.
सोमनाथ विश्वस्त समितीने संस्थेच्या सनदेत हे मंदिर अस्पृश्यांना आणि अहिंदूंना देवदर्शनास मोकळे राहील असा नियम नमूद केला होता. ते अर्थातच नाशिक, द्वारका, काशी येथील पंडित व आचार्यांना मान्य होणे शक्यच नव्हते. परंतु तर्कतीर्थ अशी अट घालणार नाहीत या विश्वासाने समितीने प्रतिष्ठेचे आचार्यत्व स्वीकारण्याची विनंती केली ती तर्कतीर्थांनी मान्य केली. स्वामी केवलानंदांनी सोमनाथाची अर्चा यथासांग पार पाडली. तर्कतीर्थांनी बाह्य व्यवस्था व व्यवहार यांची बाजू उत्तम सांभाळली.


एक महिन्याच्या अवधित सर्व तयारी करायची असल्याने कार्यक्रमापूव वाई व पुण्याचे मिळून ११ याज्ञिक ब्राह्मण दहा दिवस अगोदर म्हणजेच २७.४.१९५१ ते ७.५.१९५१ पर्यंत प्रभासला नेले होते. स्वामींजींनी त्यांचेकडून कुंडमंडपादी सर्व व्यवस्था आपल्या देखरेखीखाली करवून घेतली. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त दिनांक ११.५.१९५१ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे होता. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठेचा समारंभ पार पडणार होता. या विधीकरिता प्रधानाचार्य स्वामी केवलानंद सरस्वती, प्रमुख ऋत्विजाचार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ऋत्विज प्रमुख (उपाचार्य) वे. मु. काशिनाथ भट महाबळेश्वरकर, - वाई, उपउपाचार्य दत्तंभट महाबळेश्वरकर, वाई अशी अधिकारपदाची योजना होती. भारतातून निरनिराळ्या शाखांचे मिळून १६० ऋत्विज होते. त्यात 43 वाईतील होते. सोमनाथाच्या स्नानविधीकरिता भारतातील तीर्थे व भारतातील ५५ नद्यांचे जल आणले होते. परदेशातील नद्या व सागर अशा २८ नद्यांचे जल आणि १५ ठिकाणचे सागर-महासागर व सरोवरे येथील (भारत व परदेशी) जल आणले होते. तर्कतीर्थांना मुख्याचार्य म्हणून जी प्राप्ती झाली ती त्यांनी सोमनाथ ट्रस्टींच्या स्वाधीन केली. प्राणप्रतिष्ठेचे आचार्यत्व महाराष्ट्राकडे येणे हे महाराष्ट्रातील विद्वानांच्या परंपरेला धरून झाले. ऋषीतुल्य आचारांचे स्वामी केवलानंद सरस्वती यांचे थोर नेतृत्व या कार्यक्रमास लाभले प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई आणि वाईकरांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आणि अपूर्व अशी योगाचीच घटना आहे.

bottom of page