प्राज्ञपाठशाळा शिक्षणपद्धती
श्री. नारायणशास्त्री सदाशिव मराठे (स्वामी केवलानंद सरस्वती) हे ऑक्टोबर १८९८ मध्ये वेदाध्ययनाचे केंद्र असलेल्या वाई येथे आले. १८९८ ते १९०४ या सहा वर्षांमध्ये त्यांनी वाईतील अनेक व्युत्पन्न शास्त्र्यांकडे विद्याभ्यास केला. त्यापैकी एक स्वामी प्रज्ञानंद सरस्वती हे त्यांचे गुरू होते. ते मोठे विरक्त व वेदान्तशास्त्र निष्णात होते. त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या तोडीचा विद्वान कोणी नव्हता. त्यांच्याकडे ब्रह्मचारी नारायणशास्त्री मराठे यांनी वेदांताचा अभ्यास केला. हे करीत असताना ते व्याकरण, काव्य, भागवत हे शिकवित असत.
स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींनी त्यांच्या अंतःकाळी गुरुवर्य नारायणशास्त्रींना ‘‘आमच्या पश्चात तू पाठ चालीव’’ असा आदेश दिला. त्यानुसार गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे यांनी ‘प्राज्ञमठ’ या नावाने संस्कृत पाठशाळा चालविली. श्री. प्रज्ञानंद स्वामींचे शिष्य श्री. शंभुराव करंदीकर यांनी २०/२५ विद्यार्थी राहू शकतील अशी इमारत बांधली या उपक्रमाला राबविण्यात बापूसाहेब दातार यांची मोलाची मदत झाली. सन १९१० साली ‘प्राज्ञमठाला’ विशेष स्वरूप आले. एकेका शास्त्रांचे अध्ययन केलेले व इंग्रजी शिकलेले प्रौढ विद्याथ शिकण्यास येऊ लागले. अध्ययन सुरू असताना विद्यार्थी व गुरुजन यांची निश्चित विषयांवर चर्चा होत असे. श्री. नारायणशास्त्री मराठे यांनी महाराष्ट्रातील विद्वानांना पत्रे लिहून पाठशालेय शिक्षण कसे असावे व त्यातील विद्यार्थ्यांना पुढे काय करावे याबद्दल अभिप्राय मागविला. आलेला अभिप्राय ताडून बघता बरेचसे उपक्रम अगोदरपासून सुरू होते हे समजले व काही नव्याने समाविष्ट केले. वक्तृत्वासाठी उतारे पाठ म्हणणे, स्मृतीचर्चा, पूर्वोत्तरपक्ष, लेखनाची सवय होण्यासाठी ‘प्रातिपादक’ नावाचे पाक्षिक चालविले. प्रौढ विद्यार्थी मराठी, व्युत्पत्ती, इतिहास इये पाठ घेत होते. अशा रीतीने इतर पारंपरिक पाठशाळांपेक्षा प्राज्ञपाठशाळा नवीन स्वरूपात सर्वकष पद्धतीने सुरू झाली. तरीदेखील तिला सार्वजनिक स्वरूप देण्याच्या विचाराने सन १९१६ मध्ये विजयादशमीच्या दिवशी गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे यांच्या अध्यक्षतेखाली या खाजगी पाठशाळेस ‘प्राज्ञपाठशाळा’ असे सार्वजनिक संस्थेचे स्वरूप देण्यात आले. त्यामध्ये दिनकरशास्त्री कानडे यांनी चिटणीसाचे, महादेवशास्त्री दिवेकर यांनी प्रचारकाची तसेच गंगाधरशास्त्री सोहनी यांनी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर अन्य सर्व शिक्षकांनी पडेल ते शिक्षणाचे काम व प्रचाराचे काम करण्याचे पत्करले. तद्नंतर आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनांतून पाठशाळा दि. ३१ जुलै १९२० या दिवशी ‘प्राज्ञपाठशाळामंडळ’ या नावाने नोंदणीकृत केली.
राष्ट्रीय शिक्षण
जागतिक पातळीवर बहुतांश राष्ट्रांचा इतिहास बघितला असता धर्मनिष्ठा, राष्ट्रभिमान, स्वावलंबन, स्वार्थत्याग, धैर्य, चिकाटी, साहस, श्रद्धा, आत्मविश्वास, उद्योगप्रियता इत्यादी गुणांचा समुच्चयं जोपर्यंत सर्वसाधारण जनतेमध्ये टिकून राहतो तोपर्यंत ती- ती राष्ट्रे योग्य रितीने स्वातंत्र्याचा उपभोग घेतात असे दिसून येते. या गुणांचा संकोच झाल्यावर बऱ्याचदा स्वातंत्र्य गमावून बसल्याच उदाहरणे देता येतात. देशाच्या उत्कर्षासाठी एक प्रकारच्या राष्ट्रीय जोमाची आवश्यकता असते. अशावेळी आपल्या आनुवंशिक ठेव्याकडे म्हणजेच संस्कारांकडे वळावे लागते. यादृष्टींने राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपल्या संस्कृतीचे, म्हणजेच धर्म, परंपरा, नीतितत्त्वे, उच्चभावना, आचारविचार, शिष्टाचार त्याचबरोबर नानाविविध कला, शिल्पशास्त्र या सर्वांचे आपल्या गुरुजनांकडून आत्मीय भावनेने आणि ऐहिक पारलौकिक दृष्टीने मिळालेले शिक्षण. अशा प्रकारचे राष्ट्रीय शिक्षण व वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय गुणदोषांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशांनेे प्राज्ञपाठशाळामंडळाची स्थापना झाली.
प्राज्ञपाठशाळामंडळाचे उद्देश
1) सनातन वैदिक धर्म व आर्यसंस्कृती यांचे शिक्षण देऊन आवश्यकतेनुसार ज्योतिष, वैद्यक, कृषी, विणकाम अशा प्रकारच्या अन्य शिक्षणाची जोड देऊन स्वावलंबी, व्यवहारतज्ज्ञ, व देशाच्या भावी प्रगतीस अनुकूल देईल अशा रीतीने आयुष्याचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणारे पंडित, धर्मोपदेशक व नागरिक तयार करणे.
2) वाई किंवा अन्य सोयीस्कर ठिकाणी हिंदू तसेच निरनिराळ्या पंथांच्या लोकांकरिता सनातन धर्म परंपरेला अनुसरून शिक्षण देणाऱ्या संस्था काढणे.
3) व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, वृत्तपत्रे, नियतकालिके व धर्मग्रंथ याद्वारे सनातन वैदिक धर्माची मुख्यतत्त्वे सर्व जनतेला समजांवून देण्यासाठी प्राचीन व अर्वाचीन शास्त्रांमध्ये निष्णात असणाऱ्या विद्वानांचे संघ स्थापने.
प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या वरील उद्दिष्टांना अनुसरून अभ्यासक्रमाचे दोन विभाग करण्यात आले.
१) माध्यमिक २) उच्च
माध्यमिक अभ्यासक्रम : एकूण कालावधी 6 वर्षे सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संबंधित विद्याथ पाठशाळेच्या अथवा अन्य विद्यापीठांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो. पाठशाळेतील शिक्षणाचे विशेष.
१) श्रुती व स्मृती या ग्रंथांच्या आधारे स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे ज्ञान प्राप्त होते.
२) सर्व विषयांचे स्वभाषेतून (मराठी) शिक्षण
३) देशाच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासांतील घडामोडींचे व देशाच्या उत्कर्षापकर्षास समाजाचे कोणते सद्गुण व दुर्गुण कारणीभूत झाले याचे आकलन.
४) त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार उच्च-नीच कार्य समाधानाने व नेटाने करण्याची वृत्ती जोपासणे.
५) शरीराचा काटकपणा, व्यवहारदक्षता व शीलसंवर्धन जोपासना.
माध्यमिक अभ्यासक्रमाचे स्वरूप :
खालील विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत होते.
१) धर्मशिक्षण : स्वधर्म व स्वसंस्कृती शिक्षण. याचे पठण नित्य नैमित्तिक आचार व विचार असे तीन भाग करण्यात आले. यामुळे सर्व विषयांचे सार्थ आणि तात्त्विक ज्ञान पाचव्या-सहाव्या वष करून
दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर सुपरिणाम होईल अशी धारणा होती.
पठनात्मक : रामरक्षा, महिम्न स्तोत्र, षट्पदी, विष्णुसहस्रनाम, भीमरूपी ही स्तोत्रे.
आचारात्मक : दिनचर्येत धार्मिक नित्य आचारांचा समावेश होता.
उदा., प्रात:स्मरण, स्नान संध्या, नमस्कार, शांतिपाठ, पंचागश्रवण, त्रिसुपर्ण स्तोत्रपाठ इ. रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, कृष्णाष्टमी, गणेशचतुथ, श्री. प्रज्ञानंद स्वामींची पुण्यतिथी, दत्तजयंती, दासनवमी इ. उत्सव साजरे केले जात. एकादशी, महाशिवरात्र, श्रावणी सोमवार इ. दिवशी उपवास केले जात. भागवत, गीत, दासबोध यांची पारायणे होत असत.
विचारात्मक : श्रृति, स्मृती, गीता व रामायण ग्रंथांच्या आधारे धर्मशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वधर्माचा योग्य अभियान, कर्तव्याबद्दल जाज्वल्य निष्ठा, आस्तिक्य बुद्धी, जनहित तत्परता व बंधुभाव निर्माण होईल. विद्याथ कर्तव्यप्रवण होतील अशी धारणा होती. यामुळे प्रवृत्ती प्रपंच आणि परमार्थ, अभ्युदय आणि नि:श्रेयस यांची योग्य सांगड घातली जाईल असे धोरण होते. वैचारिक धर्म शिक्षणाची व्याप्ती अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षापासून उत्तरोत्तर वाढती ठेवली गेली.
२) मराठी : राष्ट्रीय शिक्षणामध्ये स्व-भाषेला अग्रस्थान दिलेले आहे. स्वभाषेशिवाय विकार, विचार, भावना व कल्पनाही पूर्णपणे कधीही व्यक्त होत नाही. भाषा केवळ भाषेसाठी शिकायची नसून भाषेबरोबर काही विचार व विचारांबरेाबर संस्कार करणे महत्त्वाचे असल्याने मातृभाषेचे महत्त्व अधिक आहे. रसपरिपोष व रसिकता वाढविण्याच्या दृष्टीनेही मातृभाषा महत्त्वाची आहे. शिवाय विद्याथदशेनंतर लोकांत मिसळऱ्यासाठीही उपयोग होईल. हा दृष्टिकोन होता. ज्ञानेश्वर, एकनाथ, समर्थ रामदास व तुकाराम आदि संत व मुक्तेश्वर, वामन, मोरोपंत, श्रीधर यांच्या साहित्याचा तसेच प्राचीन व आधुनिक कवींच्या रचनांचा मराठी भाषेच्या शिक्षणात समावेश होता
.
३) संस्कृत : त्या काळात संस्कृत विद्येचा भर व्याकरण तसेच अर्वाचीन ललित वाङ्मयावर होता. त्याऐवजी या पाठशाळेत विशेष भर हा जिवंत वैदिक स्मृती वाङ्मय व रामायण, महाभारत ग्रंथांचा सूक्ष्मपणे अभ्यास यावर होता. (जर्मन, फ्रेंच व इंग्रज पंडित याच सूक्ष्मपणे अभ्यास करतात हा अनुभव) त्यामुळे वैदिक धर्म व आर्य संस्कृती यांचे उत्कृष्ट ज्ञान करून देणे त्यासाठी संहिता, ब्राह्मण, उपनिषदे, सूत्रे, स्मृती, रामायण व महाभारत यांचा अभ्यासक्रमात समावेश केला होता. त्यामुळे जिवंत भाषा व विचार आणि पूर्वजांच्या ध्येयभूत आचारविचारांचे ज्ञान विद्यार्थ्यांस होत असे. संस्कृत शिक्षणास दुसऱ्या वर्षांपासून प्रारंभ होत असे, प्रारंभी सिद्ध व्याकरण व नंतर प्रक्रिया व्याकरण शिकविण्यास येई.
४) इतिहास : राष्ट्रीय शिक्षणात स्वराष्ट्रेतिहासाचे महत्त्व नक्कीच आहे. इतिहासाच्या मार्मिक अध्ययनाने बुद्धी प्रगल्भ, व्यापक व आत्मनिरीक्षण करणारी होते. इतिहासातील घडामोडींची गुंतागुंत, जयापजय व उत्कर्षापकर्ष यांचे कार्यकारण संबंध इ.चे आकलन होण्याच्या दृष्टीनेे अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दोन वर्षात हा विषय शिकवला जाई. हिंदुस्थानचा इतिहास सूक्ष्मपणे व संगतवार शिकविण्याबरोबर, रज्जूत, शीख, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादींच्या पराक्रमांची माहिती करून दिली जात होती. इतिहास शिकवताना नकाशांचा वापर करून ऐतिहासिक भूगोल शिकविला जाई.
५) भूगोल : भूगोल विषयाचे आकलन होण्यास बुद्धी अधिक प्रगल्भ असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय भूप्रदेशाचा विस्तार परिभाषा यांची यथार्थ कल्पना येत नाही. वाई क्षेत्राच्या आसपासची भूरचना वैविध्यपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासास नेऊन प्रत्यक्ष अवलोकनाने भूगोल शिकविला जाई.
६) गणित : बुद्धीचा विकास होण्यास आणि शास्त्रीय ज्ञानास व व्यवहारास उपयुक्त होईल असेच गणित सामान्य विद्यार्थ्यांस शिकविले जाई. व्यवहारात ज्याचा अजिबात उपयोग नाही असे अभ्यासक्रमातून वगळले होते. अंकगणिताचे सर्व प्रकार, बीजगणित आणि भूमिती यांचा अभ्यासक्रमात समावेश केला होता.
७) इंग्रजी : आधुनिक ज्ञानार्जनासाठी तीन महत्त्वाच्या भाषांचे महत्त्व होते. फ्रेंच, जर्मन व इंग्रजी या त्या तीन भाषा. त्याकाळात इंग्रजी राजभाषा असल्याने तिचे महत्त्व अधिक होते. फ्रेंच किंवा जर्मन नागरिक ज्या हेतूने इंग्रजीचे अध्ययन करतो त्याच हेतूने आपणही इंग्रजीचे अध्ययन करायला हवे हा दृष्टिकोन होता. वर्तमानपत्रे, मासिके तसेच आधुनिक शास्त्रीय ग्रंथ नीटपणे समजावेत इतपत इंग्रजीचे अध्ययन पुरेसे आहे या दृष्टीने इंग्रजीचा अभ्यासक्रम घेतला होतो. तसेच इंग्रजी गद्य व पद्य वाङ्मयातील निवडक भागांचा अभ्यासक्रमात समावेश केला होता.
८) रसायनशास्त्र व सृष्टीशक्तिशास्त्र : देशाच्या उन्नतीसाठी शास्त्रीय ज्ञानाची बैठक आवश्यक आहे. रसायनशास्त्र सृष्टीविज्ञानशास्त्र या दोन्ही विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे कुतूहल जागृत व्हावे, त्या विषयांचे महत्त्व पटावे व पुढील अध्ययन करताना निरीक्षणशक्ती वाढवावी तसेच या शास्त्रांचा उद्योगधंद्यात काय व कसा उपयोग होतो याची पुरेशी कल्पना यावी या दृष्टीने अभ्यास क्रमात या विषयांचा समावेश केला होता.
९) हस्तकला व चित्रकला : कार्डबोर्ड आणि कागदाच्या विविध व्यवहारोपयोगी वस्तु बनविणे, दर्भाची आसने, नवार विणणे, तसेच मातीचे चित्रे तयार करणे, सुतळी व दोऱ्यांच्या पिशव्या बनविणे इ.
चा हस्तकौशल्यांच्या कामाची समावेश होता. पहिल्या दोन वर्षांत हे शिकविले जाई. तीच गोष्ट चित्रकलेसंबंधी होती म्हणजे व्यवहारात उपयोगी पडेल इतपत या कलेचे ज्ञान देण्यात येई.
१०) संगीतकला : उत्तम व मध्यम प्रतीचा आवाज असणाऱ्या आणि कीर्तनकार होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या तीन वर्षांत संगीतकला विषय शिकविण्यात येई.
त्या अंतर्गत शुद्ध स्वरसप्तकांचे तालबद्ध २५ प्रकार मराठी भाषेतील गोड चालींची २० पद्ये, हिंदी भाषेतील तुलसीदास, कबीर व सूरदासकृत राग व ताल युक्त ४० पद्ये व रागांचे आरोह/अवरोह महत्त्वाच्या २५/३० रागांचे ज्ञान व त्यावर आधारित योजना इत्यादीचा अभ्यासक्रमात समावेश होता.
११) शारीरिक शिक्षण : शरीर निरोगी व कांटक राहावे आणि अंगात नेहमी उत्साह व तरतरी असावी, या दृष्टीने खेळांची व व्यायामाची योजना केली होती. यात प्रात:काळी सूर्यनमस्कार घालणे,
आरोग्यास पूरक अशी योगासने, पोहणे, खो-खो, हुतूतू, रस्सीखेच, फूटबॉल याचा समावेश होता. व्यायाम प्रकारांत, दंडबैठका, कुस्ती व डंबेल्स आदींचा समावेश होता. शारीरिक शिक्षणांतर्गत आरोग्यशास्त्र व इंद्रिय विज्ञानाचाही समावेश होता. शिवाय लाठी चालविणे व कवायत शिकविले जात असे. परिक्षापद्धती : प्रचलित शिक्षण पद्धतीमधील ठळक व अनर्थकारक व म्हणजे परीक्षा पद्धत आहे. त्यामुळे ज्ञानार्जन हे व्यक्तिविकासमूलक न ठरता ते केवळ परीक्षेत अधिकाधिक गुण कसे प्राप्त होतील. या दृष्टीने परीक्षापद्धती ठेवल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयांचे स्पष्ट ज्ञान कितपत झाले आहे हे विद्यार्थ्यांना समजावे व शिकविला गेलेला विषय विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडला आहे, हे अध्यापकांना समजायला हवे या दृष्टीने येथील परीक्षापद्धती अवलंबिली होती. परीक्षापद्धती खालीलप्रमाणे होती. शिकविल्या जाणाऱ्या विषयांचे एक/दोन प्रश्न ज्यांची अंदाजे तीस मिनिटांत उत्तरे देता येतील, असे महिन्यातून कोणत्याही दिवशी व दिवसातील कोणत्याही तासात कोणतीही पूर्व-सूचना न देता विचारले जात. त्यांची उत्तरे स्वतंत्र उत्तरपत्रिकेत न लिहिता एका स्वतंत्र वहीत लिहावी लागत. विषयांनुसार स्वतंत्र वही ठेवली जात असे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरे त्याच दिवशी मुलांसमोरच तपासून मिळालेल्या गुणांची नोंद वहीत जात असे त्या सर्व वह्या शाळेतच ठेवल्या जायच्या. तसेच तोंडी परिक्षेचे गुणही त्यात वहीत नोंदवले जात असत. अशा रीतीने घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांस
पुढील वर्गात प्रवेश मिळत असे. या पद्धतीमुळे नियमित उपस्थिती व नियमित अभ्यास अशी सवय विद्यार्थ्यांना लागल्याने परीक्षेबाबत विद्याथ बेफिकीर राहू शकत नसे. यामुळे परीक्षेसाठी जागरणे, आयत्यावेळची तयारी, तसेच विशिष्ट प्रसंगी परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणे इ. बिलकूल वाव नव्हता. परिणामत: विषयांचे सखोल ज्ञान तसेच प्रकृती उत्तम तात राहणे इ. आपोआप साध्य होत असे.
परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास पुढील वर्गात ढकलणे कधीही होत नसे. विद्याथगृहाची बरीचशी कामे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जात. व्यावहारिक शिक्षण : उपनिषदांमध्ये गुरूला देशिक व शिष्याला अन्तेवासी म्हटले आहे. हे तत्त्व अंशत: तरी अमलात यावे म्हणून विद्याथगृह सुरू केले. विद्याथगृहातील सर्व कामे गुरुजनांच्या देखरेखीखाली सर्व विद्याथ आळीपाळीने करत असत. कामाचे स्वरूप - बाजार करणे, पाणी आणणे, स्वयंपाक, भांडी विसळणे, दळण आणणे, जळणाची व्यवस्था, मासिक वर्गणी गोळा करणे, मधुकरी विद्यार्थ्यांची व्यवस्था, गोरक्षण, रुग्णसुश्रूषा, वाचनालयाची व्यवस्था, सारवणे, घंटा देणे, दिवाबत्ती, झाडलोट करणे, पाणी घालणे, बागेची निगा राखणे, सभा भरवणे, नियतकालिक आराखडे, नित्य नैमित्तिक उत्सव या प्रकारची सर्वच कामांची सवय झाल्याने व जीवनाला आवश्यक असणारी व्यवहारनिपुणता विद्यार्थ्यांत आपोआप विकसित होत असे. अर्थात हे सर्व आपापला अभ्यास सांभाळूनच याशिवाय स्वदेशी वस्तुभांडार विद्याथ चालवित असत.
देशसंचार : पर्यटन हे व्यावहारिक शिक्षणास अतिशय पोषक आहे. ज्यामुळे बुद्धीचा संकुचितपणा नाहीसा होतो. त्यानिमित्ताने देवस्थाने, क्षेत्रे, तीर्थक्षेत्रे, गड, दुर्ग, रणभूमी, उद्योगधंद्यांची स्थळे, कारखाने,
प्रख्यात स्थळे, निसर्गरम्य स्थळे इ. पाहण्यासाठी दरवर्षी निदान पंधरा दिवस पायी, प्रवास करावाच असा संस्थेचा नियम होता. हे झाल्याशिवाय विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे असे मानू नये यासाठी संस्था दक्षता घेत असे. निबंधलेखन व वक्तृत्व : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या दोन्हींचे महत्त्व खूपच आहे. त्यासाठी पाठशाळेत खालीलप्रकारे तयारी करून घेण्यात येत असे. प्रारंभी लहान व सोप्या गोष्टी सांगणे, नंतर एखाद्या विषयांवर व्यासंगपूर्ण, मुद्देसूद बोलणे, प्रत्येक विद्यार्थ्यांवर साधारण चार दिवसांनी पाळी येत असे. वर्तमानपत्राचा बातमीदार या नात्याने एखाद्या व्याख्यानाचे रिपोर्टिंग केले जात असे. विद्यार्थ्यांनी शारदासेवा मंडळ अशी संस्था चालविली होती. शिक्षकांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा घडवून आणली जात असे. अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती शालेय जीवनात होण्यास मदत होत असे.
उच्च शिक्षण अभ्यासक्रम : उपदेशक व पंडित वर्ग
संस्थेचा माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अथवा टिळक विद्यापीठाची प्रवेश परीक्षा किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण वर्गात प्रवेश देण्यात येत असे. परंपरागत ज्ञान तसेच आधुनिक जगाचे योग्य आकलन व्हावे या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्यामुळे एकांगीपणा नाहीसा होऊन बहुश्रुतपणा व व्यापकपणा यावा अशी रचना करण्यात आली होती. हरिदास, पुराणिक, प्रवचनकार व व्याख्यातेे यांचा उपदेशक वर्गात समावेश होते. प्राचीन परंपरा व तत्त्वे यांचा जनतेमध्ये जिवंतपणे प्रसार करण्यासाठी या वर्गाची प्रामुख्याने आवश्यकता असते. शीलसंवर्धन करणारे, देशाभिमानी, ईश्वरभक्त उपदेशक निर्माण करून त्यांच्याकरवी नागरिकांमध्ये राष्ट्रकार्य पोषकवृत्ती निर्माण करणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू होता. बुद्धिमत्ता हे देशाचे भांडवल आहे व प्राज्ञपाठशाळेचा पंडितवर्ग त्या भांडवलात भर घालेल अशी धारणा होती. नवनवे जिवंत विचार उत्पन्न व्हावेत व देशाची उत्पादक शक्ती वाढावी. त्यायोगे देश प्रगतीप्रथावर राहतो, श्रद्धा व चिकित्सक बुद्धीचा वापर करून तत्त्व शोधणारा व त्या-त्या वेळेच्या स्थितीशी योग्य ती सांगड घालणारा पंडितवर्ग तयार व्हावा हाही उच्च अभ्यासक्रमाचा हेतू होता.
प्रचारक अभ्यासक्रम : एकूण तीन वर्षे
या अंतर्गत धार्मिक, सामाजिक व राजकीय आणि व्यावहारिक अशी व्यापक बैठक ठेवली होती.
वेदान्त - वेदान्तसार, पंचदशी, नीतिशास्त्रप्रवेश, संतवाङ्मय इ. चा समावेश होता. (१ वर्ष) समाजशास्त्र, हिंदू समाजरचना यासंदर्भात काही इंग्रजी पुस्तकांचा समावेश केला होता. (१ वर्ष) राजकीय आणि व्यावहारिक : राष्ट्रीय महासभेचा इतिहास, व्यावहारिक कायदा, स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक सहकारिता यांची पूर्ण माहिती दिली जात असे.
वारकरी संप्रदाय (२ वर्षे)
ज्ञानेश्वरी - (१ वर्ष), तुकाराम महाराज, एकनाथ महाराज व नामदेव महाराज यांचे ग्रंथ १ वर्ष. रोज भजन व दर महिन्यात एक निरुपण.
पंडितवर्गाचा अभ्यासक्रम
१) न्यायशास्त्र शाखा (६ वर्षे)
२) व्याकरणशास्त्र शाखा (६ वर्षे)
३) धर्मशास्त्र शाखा (६ वर्षे)
४) वेदशाखा (६ वर्षे)
५) वेदान्तशास्त्र शाखा (६ वर्षे)
पाठशाळेत प्रवेशासाठी स्थूल नियमावली. फक्त चैत्र महिन्यात प्रवेश देण्यात येत असे. प्रवेश घेते वेळी पालकांची आपला नेमका उद्देश कळविणे आवश्यक होते. अभ्यासक्रम पूर्ण होईंपर्यंत विद्यार्थ्यांने ब्रह्मचारी असावे. पाठशाळेत शिक्षण मोफत असे. सुशील व हुशार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची विनामूल्य सवलत असे.
६) दरवर्षी दसऱ्यापासून एक महिन्यांची सुट्टी मिळत असे. असे सतरा नियम विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होती. विशेष: प्रवेश घेतेवेळी पालक व विद्यार्थी यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी असा नियम. पाठशाळेच्या ध्येयास अनुसरून कोणतेही घरगुती व समाजाची सेवा करीत असता पडणारे वाटेल ते काम करण्याची पात्रता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी यावी यासाठी पाठशाळेत आरंभापासून अशी कामे करावी लागत.