धर्मकोश


धर्मकोश
स्वामी केवलानंद सरस्वती हे जरी परिवर्तनवादी विचारांचे, पुरोगामी असे होते, तरी ते भारतीय संस्कृती आणि प्राचीन भारतीय परंपरा यांचा अत्यंत सखोल अभ्यास करणारे असे एक तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी संन्यासीदेखील होते. सन १९२५ मध्ये त्यांनी धर्मकोशाच्या बृहतप्रकल्पाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. त्या कार्याचे स्वरूप थोडक्यात असे सांगता येईल की, हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासाची, संस्कृत भाषेतील सर्वसाधारण साधने गोळा करून ती ऐतिहासिकदृष्ट्या ग्रथित करून अभ्यासकांच्या समोर अभ्यासासाठी मांडणे.वरकरणी हे काम अत्यंत साधे आणि संकलन स्वरूपाचे वाटले तरी ते तसे नाही.

धर्मकोशाचा थोडा तपशील पुढीलप्रमाणे:
‘धर्मकोश प्रकल्प’ हा ११ कांडांचा आणि ४६ खंडांचा असा आहे. गेली सुमारे शतकभर हे काम अव्याहतपणे चालू असून आतापर्यंत केवळ २७ खंडांचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक कांडातील खंडांची संख्या एकसारखी नाही. व्यवहारकांड, उपनिषदकांड, संस्कारकांड, राजनीतीकांड, शांतीकांड हे आणि या प्रकारचे असे एकूण ११ विभाग आहेत. हे काम अत्यंत बृहत आणि दीर्घकाळ चालणारे असेच आहे. या प्रकारचे काम समजून घेणे आणि ते पुढे विकसित करीत जाणे याचे आकलन असणाऱ्या आणि त्याप्रमाणे काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही नेहमीच कमी असते. त्यातही अलीकडील काळात आपल्या नव्या शिक्षण पद्धतीमुळे अथवा अन्य कारणाने या प्रकारचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती दुमळ होत चालल्या आहेत. आपल्या देशातील प्राच्यविद्याविशारद प्राध्यापक रा. ना. दांडेकर, म. अ. मेहेंदळे यांनी या कामाबद्दल गौरवाचे उद्गार काढले आहेत. या विषयाचे पाश्चिमात्य अभ्यासक प्रोफेसर लुडविग स्टर्नबाख तसेच फ्रेंच पंडित लुई रेनॉ यांनीही वाई येथे चाललेल्या या कामाबाबत प्रशंसोद्गार काढले आहेत. ‘‘वाईसारख्या छोट्या गावात विद्यापीठीय संस्कृतीपासून दूर असणाऱ्या, खाजगी देणग्यांवर चालणाऱ्या, अशा या संस्थेचा आत्तापर्यंतचा प्रवास आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे’’ अशी प्रशस्ती त्यांनी दिली आहे.

धर्मकोशासंदर्भातील अभिप्राय :
महनीय व्यक्ती तसेच देशपातळीवरील वर्तमानपत्रे व पत्रिकांतील ‘धर्मकोशा’च्या कामासंदर्भात अभिप्राय
१)महामहोपाध्याय डॉ. गंगाधर झा, अलाहाबाद,
२) प्रा. रघुवीर,
३)दी लीडर : अलाहाबाद,
४) दी हिन्दू, मद्रास,
५) मुंबई विद्यापीठ जरनल,
६) दी मॉडर्न रिव्ह्यू, कलकत्ता,
७) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे,
८) दी टाईम्स ऑफ इंडिया, मुंबई.
९) दी इन्डिपेंडन्टइंडिया, मुंबई.
या सर्वांनी ‘धर्मकोशा’च्या प्रकल्पाच्या महत्त्वाचे, त्याच्या आवश्यकतेबद्दल व समाजात होणाऱ्या उपयोगितेबद्दल व एकूणच स्वरूपाबद्दलचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि कामाबद्दल प्रशंसोद्गार काढून समाधान व्यक्त केले. डॉ. भीमराव आंबेडकर यांनीही या धर्मकोशासाठी आवश्यक असणाऱ्या अर्थसाह्य आवाहन पत्रिकेवर स्वाक्षरी केली आहे.