top of page
Logo_new-removebg-preview.png

भूमिका

कल्पनासृष्टींतील वस्तु व्यावहारिक सृष्टींत उतरलेली पाहून माझ्या मनाला अतिशय आनंद होत आहे. मला अशी आशा आहे कीं, ‘नवभारत’ जेथें जेथें जाईल तेथें तेथें सात्विक सुखाची व शांतीची दिवाळी उजाडेल. ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ अशा जीवनांत जें सत्य, शिव व सुंदर आहे, त्याला प्रकाशित व प्रगट करून त्याचा साक्षात्कार करून घेण्याला महाराष्ट्रांतील स्त्रीपुरुषांना मदत करणें हें ‘नवभारता’चें कार्य आहे. या महान्‌‍‍ व मंगल कार्यात ‘नवभारता’ला अनुभवी विद्वानांनीं आपलें साहाय्य व सहकार्य द्यावें अशी मी या कार्याला आरंभ करीत असतांना त्यांना  श्रद्धा-विनयपूर्वक विनंति करतों. मानव पशुत्व व देवत्व यांच्या सीमेवर उभा आहे. त्याच्यांत जें पशुत्व आहे, त्याची जीवनाच्या वेदीवर आहुति देऊन संपूर्ण देवत्वाची व अमरत्वाची प्राप्ति करून घेणें मानवाचें अंतिम ध्येय आहे. 


‘‘न धनेन न प्रजया त्यागेनैके अमृतत्वमानशु:|’’ ‘धनप्राप्तीनें अगर पुत्रप्राप्तीनें नव्हे तर केवळ त्यागानें अमरत्वाची प्राप्ति होते’ असा उपनिषत्कालीन ऋषींचा सानुभव सिद्धांत आहे. व्यक्तीचा विकास व समाजाची धारणा ह्यांचा समन्वय संयमधर्मांतच होऊं शकतो. व्यक्ति व समष्टि यांचा संबंध काय? व्यक्तीला स्वातंत्र्य आहे काय? असलें तर त्याची मर्यादा कोणती? समष्टीसाठीं व्यक्तीनें आपलें स्वातंत्र्य व आपलें सुख यांचा होम करावा काय? हे एकप्रकारें शाश्वत प्रश्न आहेत, व त्यांचीं उत्तरें शोधून काढण्यांत सर्व शहाण्यांची बुद्धि सदा लागलेली आहे.    


जसजशी जीवाची कर्मशक्ति अधिकाधिक प्रकट व फलदायी होत जाते, तसतसा तो जीव अधिक सुखी होत जातो. ह्या कर्मशक्तीचा प्रवाह व व्यापार संयमित करून त्याचा शिवाशीं संयोग करण्याची शक्ति ज्यामुळें माणसांत येते, तें शिक्षण. जेव्हां व्यक्ति समष्टीसाठीं सर्व सुखेच्छेचा त्याग करण्यास समर्थ होते, तेव्हां ती बुद्ध होते व तेव्हांच ती खरी स्वतंत्र होते. ‘‘सा विद्या या विमुक्तये.’’ मात्र हा त्याग वा संन्यास सक्तीचा असतां कामा नये. सक्तीनें जो संन्यासी असतो तो मनानें भोगी व मिथ्याचारी असतो. आत्मस्वरूपाच्या सत्यज्ञानांतून जो संयम स्फुरतो तोच जिवाची व शिवाची भेट घडवितो. संयमित भोगानें मिळणाऱ्या इंद्रियांच्या समाधानांतूनच शनै: शनै: वैराग्य प्रगट होतें आणि या वैराग्यांतूनच जीव-शिवाच्या एकत्वाचें दर्शन होऊन समष्टीच्या कल्याणासाठीं कर्मव्यापार करण्याची अनासक्त वृत्ति उदय पावते.  

 
व्यक्तीचा विकास, समाजाची धारणा व उत्कर्ष ह्यांचा समन्वय घालून जीवनांतील जें सत्य, शिव व सुंदर त्यांचा साक्षात्कार करून घेण्याचा मार्ग कोणता, तें दाखविण्याचा यथामति, यथाशक्ति प्रयत्न करणें हें ‘नवभारता’चें नियोजित कार्य आहे. ‘नवभारत’ हें पवित्र कार्य ‘‘सर्वेषां अविरोधेन’’ करीत राहील. सर्व सत्पुरुषांच्या शुभाशिर्वादाची कामना आहे. कर्मयज्ञ होईल तर तो मिळेल अशी श्रद्धा आहे.

सत्यसंकल्पाचा दाता भगवान्‌‍ महाराष्ट्रीय विचारवंतांपुढील समस्या

समाजाचा विकास त्याच्या संस्कृतींत प्रतिबिंबित झालेला असतो. मनुष्यमात्राच्या अंत:करणामध्यें सत्य, सौंदर्य, साधुत्व या मूल्यांच्या अंतिम प्रेरणा सतत उसळत असतात. त्यांमधून संस्कृतीचें स्वरूपहि विकसित होत जातें. या सांस्कृतिक मूल्यांचा वाढता पगडा सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अधिकाधिक कसा पडत जाईल हें पाहण्याचें काम सर्व समाजसेवकांना सतत करीत रहावें लागतें. सामाजिक जीवन कितीहि गुंतागुंतीचें असलें तरी त्यामध्यें एकजीवपणा असतो. ह्या एकजीवतेची सतत वाढ करीत गेल्यानेंच सामाजिक जीवनाला समृद्धि लाभते. संस्कृतीला हळूहळू उमलत जाणाऱ्या सहस्त्रदल कमलाची उपमा देतां येईल. समाज-जीवनाच्या वाढत्या विकासाचें हें स्वरूप ध्यानीं घेऊन समाजांतील सर्व प्रेरणांचा आणि सर्व चळवळींचा शक्य तेवढा समन्वय करीत राहिलें पाहिजे. महाराष्ट्रांत अनेक प्रकारच्या चळवळी चालत असतात. अनेक बुद्धिमंत अनेक विषयांवर चिंतन करीत असतात. शास्त्र, कला, धर्म, राजकारण, शिक्षण आणि व्यापार इत्यादि विविध क्षेत्रांत विविध प्रकारची शक्ति खर्च होत असते. या सर्व प्रवृत्तींचा एका व्यापक भूमिकेवरून समन्वय करतां आला तर महाराष्ट्राचें सांस्कृतिक सामर्थ्य अधिक वाढेल, निष्कारण विरोधामळें वाया जाणारी शक्ति वांचवितां येईल आणि मतभेद राखूनहि सामाजिक सुधारणेच्या कामांत सहकार्य वाढवितां येईल. महाराष्ट्राचें भौतिक दारिद्य्र आणि सामाजिक विषमता यामुळें महाराष्ट्रांतील विचारवंत आणि सामान्य जनता यांमध्यें भीषण अंतर पडलेलें आहे. हें अंतर तोडल्याशिवाय महाराष्ट्राची सामाजिक शक्ति वाढणे शक्य नाहीं. यासाठीं महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांनीं एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे सारे सत्पुत्र संस्कृतीचे उपासक म्हणून एकत्र येऊं शकतील असा आमचा विश्वास आहे.    

पाश्चात्य आक्रमणामुळें सर्वस्वी गुलामगिरींत पडलेल्या हिंदुस्थानची परतंत्रता जाऊन त्याला आतां स्वातंत्य प्राप्त झालेलें आहे. पाश्चात्य संस्कृति आपल्या अंतर्विरोधामुळें जगाच्या सांस्कृतिक मूल्यांत भर टाकील किंवा सामान्य जनांना शांति व सुख देईल ही आशा फोल ठरूं पहात आहे. आशियांतील मागासलेल्या राष्ट्रांना पुन्हा वैभवाची स्थिति प्राप्त होणार अशीं चिन्हें दिसत आहेत. नवें जग, नवा मानव आणि नवीन संस्कृति निर्माण करण्याची भाषा सर्व जगभर सुरूं झालेली आहे. लोभी व्यापारी आणि ढोंगी मुत्सद्दी यांच्या सर्वस्वीं आहारीं गेलेल्या इंग्लंड-अमेरिकेच्या हातून किंबहुना केवळ एकट्या रशियाच्या हातूनहि या नव्या जगाची, नव्या मानवाची आणि नव्या संस्कृतीची निर्मिति होऊं शकेल असें आम्हांस वाटत नाहीं. ही नवी संस्कृति हिंदुस्थानांतच निर्माण होऊं शकेल अशी आम्हांला दृढ आशा वाटते. ही नवी संस्कृति राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक समता, सामाजिक बंधुता या आध्यात्मिक मूल्यांतून निर्माण होणार आहे. या मूल्याचा व्यावहारिक आविष्कार यशस्वी रीतीनें कसा करितां येईल, हीच येथल्या विचारवंतांपुढील मुख्य समस्या आहे. जागृत झालेल्या हिंदुस्थानांत महाराष्ट्रानें आपलें योग्य स्थान मिळवावें आमची उत्कट इच्छा आहे. महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जितका उज्वल आहे तितकाच त्याचा भावी कालहि उज्वल व्हावा अशी आपण दक्षता बाळगली पाहिजे. यासाठीं आपल्या परंपरेतील तेजस्वी तत्त्वांच्या आश्रयानें आधुनिक काळाच्या गरजा आणि उच्चतर संस्कृतीची हांक यांचा विचार करून पुढचा रस्ता सुधारला पाहिजे. या भावी संस्कृतीच्या निर्मितीसाठीं नानाविध भौतिकशास्त्रांचें ज्ञान आर्थिक संघटनांची विद्या आणि लोकशाहीचे तंत्र आपणांस हस्तगत करावें लागेल, महात्मा गांधींचा सत्याग्रह, मार्क्सचा समाजवाद आणि युरोपांतील बुद्धिवाद, तसेंच व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही इत्यादि तत्त्वें या सर्वांचा महाराष्ट्रीय विचारवंतांनीं ऊहापोह केला पाहिजे. मात्र त्या तत्त्वांना तेथें जडलेली विकृति नष्ट करून त्यांच्या मूलभूत स्वरूपांतहि तीं महाराष्ट्रांत पेरलीं जातील व शुद्ध स्वरूपांत विकास पावतील असा प्रयत्न झाला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या संस्कृति-विषयक विचारांत योग्य दिसेल ती भर घातली पाहिजे. या विचारांनीं प्रेरित होऊन आम्ही या मासिकाच्या प्रकाशनाला आरंभ करीत आहों. विशिष्ट सांप्रदायिक दृष्टि न ठेवितां सांस्कृतिक उपासनेची व्यापक दृष्टि राखण्याचा आम्ही निर्धार केला आहे. या कार्यात महाराष्ट्रांतील सर्व विचारवंतांचे सहाय्य मिळेल अशी आम्हांस आशा आहे.

नवभारताची भूमिका

मानवाच्या व मानवसंस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल अशा प्रकारें महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृतीचा विकास करणें हें या मासिकाचें ध्येय व उद्दिष्ट आहे. ध्येयप्रवण व्यक्तींनीं स्वोन्नतीच्या हेतुपूतसाठीं जें आपलें सांस्कृतिक मूल्यमापन ठरविलेलें असेल, उच्च वातावरणांतील जो अभिजात अनुभव स्वत:च्या साधनेनें संगृहीत केलेला असेल, त्याचें दिग्दर्शन हेंच संस्कृतिपोषक वाङ्मय होऊं शकतें, असा संचालक व संपादक--मंडळ यांचा विश्वास आहे.       

    ह्या मासिकांत येणाऱ्या लेखांत कोणत्याही विशिष्ट मताचा, वादाचा, पक्षाचा किंवा पंथाचा प्रचार करण्याचा हेतु नाहीं.

संचालक व संपादक

मंडळांतील सर्व व्यक्ति यांचेंही सर्व विषयांत मतैक्य आहे असें नाहीं. मानवी जीवनविषयक व सांस्कृतिक मूल्यासंबंधी सदृश अशा दृष्टिकोनानेंच त्यांना एकत्र आणलें आहे. तथापि प्रत्येकाचें व्यक्ति-वैशिष्ट्य व विचार-स्वातंत्र्य यांचा विनाश न होता विकास व्हावा या दृष्टीनेंच त्यांचें सहकार्य राहील. प्रत्येक व्यक्ति आपल्या नांवानें प्रसिद्ध होणाऱ्या लेखाबद्दलच जबाबदार राहील.चालू विषयांसंबंधी जे विचार प्रसिद्ध होतील, त्यांवर जेव्हां सही नसेल तेव्हां कार्यकारी संपादकाचें वैयक्तिक मत ते विचार प्रकट करतात असें मानलें जाईल. मासिकांत प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक लिखाणांत सत्यनिष्ठा, संयम, आणि सहिष्णुता असतील अशी काळजी घेतली जाईल.

bottom of page