top of page
Logo_new-removebg-preview.png

भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर

धर्मकोश आणि सोमनाथ प्रतिष्ठा यामुळे प्राज्ञपाठशाळेचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाले होते. त्यामध्ये भारतीय संविधानाच्या संस्कृत भाषांतरामुळे संस्थेचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. हे भाषांतराचे काम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले.


भारताच्या घटनासभेने सन २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान स्वीकारले. घटना सभेने भारतातील चौदा भाषांना मान्यता दिली होती. घटनेचे संस्कृत भाषांतर करण्याचा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा ही जबाबदारी केंद्र सरकारने तर्कतीर्थांकडे सोपविली. हे अत्यंत महत्त्वाचे आणि अवघड काम प्राज्ञपाठशाळामंडळाकडे अपरिहार्यपणे सहजच आले. हे भाषांतर करण्यासाठी तत्कालीन लोकसभा सभापतींनी संस्कृत भाषांतरासाठी समिती नियुक्त केली. त्या समितीचे सभापती होते महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे.


समिती खालीलप्रमाणे
१) म. म. पांडुरंग वामन काणे, एम्‌‍. ए., एल्‌‍एल्‌‍. एम्‌‍., मुंबई सभापती
२) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, धर्मकोशाचे प्रधानसंपादक, प्रमुख भाषांतरकार व समिती निमंत्रक
३) डॉ. मंगलदेवशास्त्री एम्‌‍. ए., डी. फिल्‌‍., (बनारस) भाषांतरकार
४) डॉ. सुनीतीकुमार चतज, एम्‌‍. ए., डी. लिट्. लंडन (कलकत्ता)सदस्य
५) श्री. के. बालसुब्रह्मण्यम्‌‍ अय्यर, बी. ए., बी. एल्‌‍., ॲडव्होकेट, (मद्रास) सदस्य
६) म. म. गिरिधरशर्मा चतुर्वेदी, डायरेक्टर संस्कृतस्टडीज्‌‍, हिंदू युनिव्हर्सिटी, (बनारस) सदस्य
७) डॉ. बाबूराम सक्सेना, एम्‌‍. ए., डी. लिट्., (अलाहाबाद) सदस्य
८) पंडित राहुल सांकृत्यायन, (मसुरी) सदस्य
९) डॉ. रघुवीर, (नागपूर) सदस्य
१0) मुनिजिनविजयजी, डायरेक्टर भारतीय विद्याभवन, (मुंबई)सदस्य
११) डॉ. कुन्हनराजा (मद्रास) सदस्य
या विद्वानांचा मान्यवरांचा समितीत समावेश होता.


कलम १ ते २६३ आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर तर्कतीर्थांनी केले तर २६४ ते ३९५ कलमांचे भाषांतर डॉ. मंगलदेवशास्त्रींनी केले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात वाईच्या प्राज्ञपाठशाळेत हे भाषांतर पूर्ण करण्यात आले. त्यानंतर तपासणी समितीने २१ दिवस बसून, भाषांतराचे कलमवार वाचन करून दुरुस्तीसह अंतिम मसुदा लोकसभा सभापतीकडे पाठविला. लोकसभेने मंजूर केल्यावर अधिकृत संस्कृत घटना अस्तित्वात आली.


पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुंदराव जयकर व लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. नानासाहेब घारपुरे यांनी इंग्रजी घटनेच्या काही महत्त्वाच्या कलमांचे संस्कृत भाषांतर प्रत्यक्ष ताडून पाहिले. संस्कृत भाषेचे सामान्यज्ञान असणाऱ्या कोणाही मनुष्याला सहज समजेल अशा रीतीने सोपे भाषांतर केल्याबद्दल दोघांनी तर्कतीर्थांचे अभिनंदन केले. संस्कृत घटनेच्या भाषांतराची पहिली आवृत्ती प्राज्ञपाठशाळा मुद्रणालय, वाई येथे सन १९५२ ला मुद्रित करण्यात आली.

bottom of page