top of page
Logo_new-removebg-preview.png
Untitled.png

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

Untitled.png

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जन्म - (जन्म २७ जानेवारी १९०१ - मृत्यू २७ मे १९९४) महाराष्ट्रातील संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक आणि थोर विचारवंत तर्कतीर्थ यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावी झाला. वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे चंद्रभागा. आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध झालेले वेणीमाधवशास्त्री हे त्यांचे थोरले बंधु. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वष वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिक्षणासाठी दाखल झाले. स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय- वेदान्तादी प्राचीन संस्कृत शास्त्रांचे अध्ययन केले. ‘तर्कतीर्थ’ ही पदवी कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून संपादन केली. इंग्रजी भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांचा त्यांनी सखोल व्यासंग केला. १९२७ मध्ये मुल्हेरच्या (जिल्हा नाशिक) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्राज्ञपाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते. ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. या वातावरणातून राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा शास्त्रीजींना लाभली. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास महात्मा गांधींना हिंदुधर्मशास्त्राचे पूरक भाष्य शास्त्रीजींनी तयार करून दिले. १९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने सहा-सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पाटचे ते १९३६ नंतर क्रियाशील सदस्य झाले. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित झाले होते. प्राज्ञपाठशाळेतर्फे ‘धर्मकोशा’च्या मौलिक संपादनाचे व एकमेवाद्वितीय अशा बृहतप्रकल्पाच्या संपादनाचे कार्य त्यांनी हाती घेतले होते. या कोशाचे त्यांच्या हयातीत ११ खंड प्रसिद्ध झाले व आतापर्यंत २७ खंड प्रकाशित झाले आहेत. या खंडांत कुटुंबसंस्था, हिंदुसंस्कार, जाती, विवाह, मालमत्ता याचप्रमाणे हिंदुधर्मविधी, नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान इ. विषयासंबंधी प्राचीन शास्त्रांतील ग्रांथिक माहिती व्यवस्थितप्रमाणे संकलित केलेली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सुरुवातीपासून म्हणजे १९६० पासून शास्त्रीजी अध्यक्ष होते. मंडळातर्फे भाषा- साहित्यविषयक अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यापैकी प्रमुख प्रकल्प वीस खंडांचा ‘मराठी विश्वकोशा’चा आहे. प्राचीन व आर्वाचीन सर्व ज्ञानविज्ञाने मराठीतून विशद करण्याचे मौलिक कार्य शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.

 

व्याख्याने - व्याख्याने, परिषदांच्या निमित्ताने शास्त्रीजींनी भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच युरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यांनी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून वा स्वतंत्रपणे निमंत्रित म्हणून भेटी दिल्या आहेत. भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे ते १९५४ साली अध्यक्ष होते. 


ग्रंथसंपदा - त्यांची ग्रंथसंपदा मोजकी पण मौलिक आहे. 

१. शुद्धिसर्वस्वम्‌‍ (१९३४) 

२. आनंदमीमांसा (१९३८) 

३. हिंदुधर्माची समीक्षा (१९४१) 

४. जडवाद (१९४१) 

५. ज्योति-निबंध (१९४७) 

६. वैदिक संस्कृतीचा विकास (१९५१) 

७. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त (१९७३) 

८. राजवाडे लेखसंग्रह (१९६४)

९. लोकमान्य टिळक लेखसंग्रह (१९६९) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ आहेत. त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला पहिला मराठी ग्रंथ आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिवादी विचारवंतांच्या थोर परंपरेतच शास्त्रीजींचे कार्य मोडते. संस्कृत पंडित म्हणून भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कारने गौरविले आहे.

(१९०१ ते १९४०)
bottom of page