top of page
Logo_new-removebg-preview.png
Untitled.png

स्वामी केवलानंद सरस्वती

Untitled.png

स्वामी केवलानंद सरस्वती - (जन्म ८ डिसेंबर १८७७ - मृत्यू १ मार्च १९५५) 

स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव नारायणशास्त्री मराठे. यांचा जन्म ८ डिसेंबर १८७७ रोजी सुडकोली ता. रोहा, जि. रायगड येथे झाला. वडिलांचे नाव सदाशिव व आईचे नाव पार्वती. स्वामींना चार भाऊ होते. नारायण सर्वात धाकटा. मराठे कुटुंबाकडे उपाध्येपण आणि धर्माधिकारीपण होते. त्याकाळानुसार नारायणशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण घरातच झाले. त्यांचे संस्कृतचे अध्ययन त्यापरिसरातील शास्त्री पंडितांकडे झाले. परंतु या अध्ययनाच्या मर्यादा त्यांना जाणवू लागल्या. सन १८९८ मध्ये वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी ते वाईस आले. वाईमध्ये विष्णुशास्त्री करंदीकर, बाळशास्त्री डेंगवेकर, विष्णुशास्त्री मेणवलीकर, बाळंभट रानडे इ. वेदान्तींकडे अध्ययन केले. नंतर त्यांचे विद्यागुरू आणि परमार्थ गुरू स्वामी प्रज्ञानंद यांचेकडे संहिता, आरण्यक, षडंगे, वेदांगे, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र व शारिरक भाष्य इ. चे अध्ययन केले. त्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी म्हणजे १९०४ रोजी गुरूंच्या नावाने प्राज्ञमठ स्थापन केला. ६ ऑक्टोबर १९१६ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर प्राज्ञपाठशाळेची स्थापना झाली आणि २१ जुलै १९२० रोजी प्राज्ञपाठशाळामंडळ या नावाने नोंदणीकृत संस्था झाली. 


स्वामीजींनी केलेली कार्ये 

प्राज्ञपाठशाळा - या पाठशाळेस स्वधर्माचे व स्वसंस्कृतीचे शिक्षण देणारी नमुनेदार संस्था बनवावी; देश-काल परिस्थितीला अनुसरून व जरूर अशा शिक्षणाची भविष्यकाळाकडे नजर देऊन जोड द्यावी; असा स्वामींचा विचार होता. भारतातील प्राचीन विद्येचे व गुरुकुल शिक्षणपद्धतीचे पुनरुज्जीवन होण्याकरिता ही संस्था त्यांनी २२ वर्षे चालविली. पौर्वात्य विचार आणि पाश्चिमात्य ज्ञानशाखांचा आधुनिक विचार, यांचा समन्वय करणारी ही त्या काळातील कदाचित एकमेव पाठशाळा असावी. साधारणतः १९६६ पर्यंत ही शाळा चालू होती. या पाठशाळेस लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी भेट दिली होती व समाधान व्यक्त केले होते. १९१७ मार्च मध्ये विनोबा वेदांताच्या अभ्यासासाठी स्वामींकडे या पाठशाळेत वाईस आले होते. उपनिषद, गीता, बह्मसूत्र आणि शांकरभाष्य, मनुस्मृति, पातंजल योगदर्शन यांचा अभ्यास व न्यायसूत्र, वैशेषिक सूत्र, याज्ञवल्क्य स्मृति यांचा अभ्यासही केला. ११ मे १९५१ ला सोरटी सोमनाथाची पुनः प्रतिष्ठापना विधीचे स्वामींनी नेतृत्व केले होते. 


धर्मकोश - हिंदुधर्माचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करता यावा आणि भारतीय तत्त्वज्ञान, समाजसंस्था व नीतिशास्त्र यांच्या अभ्यासाची सामग्री एकत्र मिळावी म्हणून धर्मकोश नावाचा बृहत्‌‍ संदर्भ ग्रंथ निर्माण करण्यास सुरुवात केली. अद्यापही ते कार्य चालू आहे. एकूण ४६ खंडांपैकी २७ खंडांचे काम पूर्ण झाले आहे. 


धर्मनिर्णय मंडळ - देशकाल परिस्थितीप्रमाणे धर्म व समाजसंस्था यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचे काम आवश्यक असते व त्यामुळेच मूलभूत तत्त्वास ही उजाळा मिळतो अशा विचाराने धार्मिक व सामाजिक सुधारणेला प्रारंभ केला. अशा सुधारणेच्या उद्देशाने धर्मनिर्णय मंडळ निर्माण केले. या मंडळाने स्वतःचे पंचांग काढले होते. 


स्वामीजींची प्रकाशित ग्रंथरचना

१. पूर्वमीमांसा सूत्रपाठाची संशोधित आवृत्ती. 

२. कौषीतकीब्राह्मण - आरण्यक विषयकोश. 

३. ऐतरेयब्राह्मण - आरण्यक विषयकोश. 

४. मीमांसाकोश - भाग १ ते ७. 

५. अद्वैतसिद्धीचे मराठी भाषांतर भाग १ ते २. स्वामींच्या चरित्राची रूपरेषा - स्वामीजींनी वयाची पहिली ५४ वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या तपात व्यतीत केली. नंतर १९३१ साली संन्यास दीक्षा घेतली. वयाच्या २२ व्या वर्षापासून निर्वाणापर्यंत सर्वकाल अध्ययन, अध्यापन, तत्त्वचिंतन, शास्त्रलेखन व ईश्वरोपासना यात गेला. स्वामीजींचे नैतिक व धार्मिक जीवन अत्यंत अलौकिक होते. वयाच्या ७८ व्या वष दि. १ मार्च १९५५ ला पहाटे अडीच वाजता ते समाधिस्थ झाले.

(१८७७ ते १९५५)
bottom of page